शेतकरी संघात संचालकांसह काही कारभारी कर्मचाऱ्यांचीही ‘हाथ की सफाई’ (भाग -४)

0
255

कोल्हापूर (सरदार करले) : ज्यांनी संघाला आर्थिक स्थैर्य आणले, त्यांच्या वारसांचा दुराग्रह, हट्टीपणा, हेकेखोरपणा यामुळेही संघ अडचणीत आला. कुणाचेच नियंत्रण नसल्याने काही कर्मचाऱ्यांनीही हात धुवून घेतले. विश्वस्तांनी पदाचा गैरवापर करून भरमसाठ उधारी केली. लाखो रुपये आजही वसूल झालेले नाहीत.

आपण म्हणेल तीच पूर्व दिशा अशी भूमिका काही जाणकार आणि ज्येष्ठ कारभाऱ्यांनी घेतली. जागा विकून आलेल्या पैशातून खेळते भांडवल उभा करून संघ जोरात कसा चालेल, यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण, ते पैसे गोडाऊन, मंगल कार्यालय आदी ठिकाणी गुंतवले. गोडाऊन उभारणीसाठी काही निधी संघाला जरूर मिळाला. पण, ‘नाले’ साठी ‘घोडा’ खरेदी करण्यासारखी अवस्था झाली. खेळत्या भांडवलाअभावी माल नाही आणि माल नाही म्हणून ग्राहक नाही, अशी अवस्था झाली.

काही तरी भव्य दिव्य करण्याच्या नादात शेतकरी बझार सुरू केला. प्रथम तो चांगला चालला. नंतर तो डबघाईला आल्यावर ‘मॅग्नेट’ बझारचा डाव मांडला. पण, जुना राजवाडा परिसरात वाहन तळाची व्यवस्था नाही. अनेक बंधनांंमुळे ग्राहकांची वर्दळ कमी झाली. परिणामी मॅग्नेटने अल्पावधीतच मान टाकली. हा व्यवहारही फसला.

संचालक म्हणजे संस्थेचे विश्वस्त, पालक. त्यांनी लक्ष न देता आपला स्वार्थ कसा साधेल यावरच भर दिला. मोक्याच्या ठिकाणी असलेला पेट्रोल पंप सोडावा लागला. भांडी कारखान्याची जागा गेली. संघ माझा नव्हे माझ्या ..’….’… चा असं म्हणत अनेक विश्वस्तांनी आपल्या संस्थांना लाखो रुपयांची खते आणि इतर साहित्य उधारीवर दिले. साहेबांनी सांगितल्यावर कर्मचारी तरी काय करणार? वसुली कुणाकडे करायची ?

काहींनी तर संबंधित संस्थेकडून उधारीची रक्कम परस्पर उचलून ती स्वतःसाठी वापरली. कोण विचारणार ? संघाचा संचालक आणि पदाधिकारी झाल्यावर यांचा रुबाब वाढला. फिरायला चारचाकी आली. मग, ती स्वतःची का असेना. पण त्यात पेट्रोल, डिझेल कुठून घालणार. त्याच्याकडे उत्तर एकच. ड्रायव्हरला सांगायचं’ ‘गाडी घे संघाच्या पंपावर.’ गाडीची टाकी फुल्ल. पण, संघाचा ‘गल्ला’ गुल अशी अवस्था झाली. काही जण बाहेरगावी जाताना पंपावरून रोख रक्कमही घेत. त्याचा परतावा झाला की नाही हे कोण बघणार ?

विश्वस्तांचा सावळा आणि अनागोंदी कारभार पाहून काही कर्मचाऱ्यांनी अंदाज घेतला आणि आपणही हात की सफाई सुरू केली. अनेक शाखेत कर्मचाऱ्यांनी अपहार केला. चौकशी करून वसूल कोण करणार ? तूही चोर आणि मीही चोर. संघाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संघासाठी खरेदी करताना कर्मचारी टक्केवारी घ्यायला लागले. न खपणारा माल गळ्यात पडला. संचालक, कारभारी, कर्मचारी यांना संघात नेमकं काय चाललंय हे विचारण्याची सुबुद्धी नेत्यांना झाली नाही. त्यामुळे आशिया खंडात गाजलेला संघ गटांगळ्या खावू लागला. धुष्ठपुष्ट बैलाचा आता केवळ हाडाचा सांगाडा शिल्लक उरला आहे.

 

क्रमशः