कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अशा प्रक्रिया प्रकल्पांवर निधी खर्च करावा. तसेच इचलकरंजी नगरपरिषदेने क्लस्टर पध्दतीने सांडपाणी उचलून प्रक्रिया करून प्रदूषण रोखण्याबाबतचा आराखडा सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंचगंगा नदी प्रदूषणबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलतत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी याबाबत बैठक घेतली आहे. यासंदर्भात कायमस्वरूपी आराखडा करण्याबाबत सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या ९६ एमएलडी पाण्यापैकी ९१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करुन पंचगंगेत सोडले जाते. त्याच पध्दतीने पंचगंगा नदीकाठावर असणाऱ्या ग्रामपंचायती आणि इचलकरंजीमधील औद्योगिक कारखाने यांनीही सांडपाण्यावर प्रकिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. यावर कालबध्द कार्यक्रम करावा. इचलकरंजीमध्ये डाईंग युनिट घरोघरी आहेत. यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर काय प्रक्रिया करता येईल. क्लस्टर पध्दतीने हे पाणी साठवून उचलता येईल का याबाबतचा आराखडा नगरपालिकेने तयार करावा.

नदीकाठावर असणाऱ्या ग्रामपंचायतींनीही स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्राप्त झालेला यावर्षीचा निधी केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरच खर्च करावा. पंचगंगेच्या आजूबाजूला उचगाव, गांधीनगर, तळंदगे, पाचगाव अशा गावांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्रकल्प करावा. त्यासाठी दीड कोटी मंजूर करण्यात आले आहेत. महिन्याभरात डीपीआरचे काम पूर्ण करावे. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व यंत्रणेने प्रयत्न करावेत.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांना नोटीस पाठवून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तपासणीच्या सूचना दिल्या आहेत. दूध पिशव्यांबाबत इको सिस्टीमसाठी नियोजन करा. घरोघरी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून दूध पोहचवण्यात येत असते. या पिशव्यांबाबत इको सिस्टीम काय करता येईल याबाबत दूध उत्पादक संस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेवून त्यांच्याकडून नियोजन आराखडा घ्यावा. ‘आय इट प्लास्टिक’ असे घोषवाक्य घेवून महापालिकेने नाविन्यपूर्णमधून पथदर्शी प्रकल्प राबवावा.

बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उदय गायकवाड, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, इचलकंरजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे आदी उपस्थित होते.