जांभळीतील दत्त मंदिर परिसरात मृत कोंबड्या : कारवाईची मागणी (व्हिडिओ)   

0
232

शिरोळ  (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातील माळभागावर असलेल्या दत्त मंदिराच्या परिसरात  अज्ञातांने  मृत कोंबड्या आणि त्यांचे अवशेष  आणून टाकले  आहेत. त्यामुळे या परिसरात  दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच येथे कोंबड्यांचे अवशेष खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांच्या वावर वाढला आहे.  त्यामुळे येथील परिसर नागरिकांसाठी धोक्याचा ठरला आहे. तरी येथे कोंबड्या टाकणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना व संत रोहिदास विकास फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष निशिकांत शिंदे यांनी केली आहे.

याबाबत ग्रामपंचायतीला  दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, दत्त मंदिराच्या परिसरात  फेकण्यात आलेल्या कोंबड्या  आणि त्यांच्या अवशेषामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे.  त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटकी कुत्री या कोंबड्या नागरी वस्तीमध्ये आणून टाकत आहेत. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या कोंबड्या परिसरामध्ये कोणी टाकल्या ?  या ठिकाणी कोंबड्या टाकण्याची परवानगी कोणी  दिली ?  या कोंबड्या  कशामुळे मृत्यूमुखी पडल्या  की मारल्या ? या कोंबड्यांना कोणता रोग झाला होता का ?  याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.