कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. दररोज दुपारी १२ ते  ३ वेळेत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय आज (बुधवार) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

जाधव यांनी सांगितले की, मिशन अनलॉक अंतर्गत अंबाबाई मंदिर खुले झाल्यापासून दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री ८ अशी होती .मात्र  वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजे गुरुवार दि. २५ पासून दर्शन वेळ आता सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री ८ अशी करण्यात आली आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिर पूर्णपणे बंद रहाणार आहे

शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क, सॅनिटायझरही वापरणे बंधनकारक आहेच, त्याचप्रमाणे सुरक्षित वावराचा नियम पाळावे लागतील. तरच दर्शनासाठी परवानगी दिली जाईल. मंदिर परिसरात फोटो काढताना आढळल्यास मोबाईल फोन जप्त केले जातील, असा इशाराही जाधव यांनी दिला.

या वेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, पुजारी प्रतिनिधी माधव मुनिश्वर उपस्थित होते.