कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील निगवे येथे आई-वडिलांसह बाबू आणि त्यांचे ४ बंधू राहत होते. मिळेल ते काम करुन पोटाची खळगी भरत हे कुटुंब उदरनिर्वाह करत होते. इयत्ता चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेत बाबू राज्यात पहिला आला. घरची परिस्थिती नसल्याने शिक्षकांनी बाबूला सातार्‍यातील शासकीय शाळेत घातले. तेथून दहावी झाल्यानंतर बाबूने गोखले कॉलेजमधून बारावी सायन्स केले. आता आपले लहानपणाचे एमबीबीएसचे स्वप्न पूर्ण होणार या खुशीत बाबू होता. मात्र, प्रत्येकवेळी शिक्षणाचा खर्च आडवा येत गेला. डॉक्टर होऊ न शकल्याने मनाने खचलेला बाबू बी.एस्सी झाला. जोडीला त्याने गायनाची आवड जपली. दरम्यानच्या काळात बारावीपर्यंत विद्यार्थ्यांचे होम ट्युशन घेऊ लागला. मग उदरनिर्वाह करण्यासाठी वस्तू विकण्याचे काम केले. पण त्याचे चंचल मन कुठेच रमले नाही. शेवटी काही मानसिक स्थिती खालावल्याने तो चक्क व्यसनाधीन बनला.

पण बाबुराव दमला नाही बरं का. मिळेल ते काम करत राहिला. नशिबानं साथ दिली आणि बाबुरावचा विवाह झाला. त्याची पत्नी कोल्हापूर येथे एका खासगी दवाखान्यात नर्स आहे. तर दोन मुली बीएस्सीचे शिक्षण घेत आहेत आणि मुलगा दहावीला आहे. मात्र, बाबूचे पुन्हा मानसिक संतुलन ढळले. कधी कोल्हापुरात तर कधी बावड्यातील गल्‍लोगल्‍लीत सुरेल आवाजात गाणी म्हणत फिरू लागला. आणि  खच्याक मामा या नावांने कोरोना काळात अस्खलित इंग्रजीत भाषण देऊ लागला.  पाहता पाहता सोशल मीडियावर तो चांगलाच प्रसिद्ध झाला. गाणी किंवा भाषणाच्या शेवटी “इव्हरी बडी से खच्याक” म्हणणारा बाबू खच्याक मामा नावानेच ओळखू लागला.

बाबूचे कोरोनावरील इंग्रजीतील भाषण सध्या युट्यूबवर गाजत आहे. रस्त्यातून जाताना एखादा पाण्याचा नळ सुरू दिसला, तरी घरातील कोणालातरी बोलावून, अहो.. ताई पाणी वाया घालवू नका, असा शहाणपणाचा सल्‍ला देणारा मामा मानसिक रोगी तरी कसा म्हणायचा. मास्क वापरा, स्टे अ‍ॅट होम, असे वारंवार सांगणारा मामा काही आौरच. मोहम्मद रफी, किशोर कुमार, आणि मुकेशची हिंदी गाणी गात फिरतो. टिकटॉक, फेसबुक आणि व्हॉटस्अपच्या जमान्यात बाबुराव तरुणाच्या गळ्यातील ताईत झाला. तरुणाच्या एका घोळक्यात बाबू गाण म्हणत होता. त्यातील एकाला बाबूने विचारले काय करतोस? तो म्हणाला सीए सेकंडला आहे. बाबू त्याला म्हणाला, तुला न सुटलेला स्टॅटस्चा प्रॉब्लेम मला सांग. यावर मला सुटेना याला काय सुटणार? असे म्हणत त्या तरुणाने काहीशा चेष्टेनेच त्याला वहीपेन दिला. बाबूने तब्बल दोन प्रकारे प्रॉब्लेम सोडवून दाखविला. बाबूची बुध्दीमत्ता पाहून सारेच आवाक् झाले. अशा खच्याक्‌ मामाची अचानक एक्झिट मनाला चटका लावून गेली. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणारे मामा यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.