कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाण्याची तयारी शहर शिवसेनेतर्फे होताना दिसत नाही. गटा-तटात सेना विभागल्याने आगामी निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना आव्हानांचा डोंगर उभा राहणार आहे. वास्तविक जिल्ह्यात शिवसेनेचे एक आमदार, दोन खासदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्षपद (कॅबिनेट दर्जाचे) आहे. लढाऊ शिवसैनिक आहेत, पण एकी नाही. एकीकडे काँग्रेसचे नेतृत्व ना. सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेतृत्व ना. हसन मुश्रीफ करीत असताना शिवसेनेचे नेतृत्व करणारेच कोणी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना मनपा निवडणुकीचे शिव ‘धनुष्य’ कसे पेलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेची ताकद विस्कळीत होत आहे. जिल्ह्यात खंबीर एकहाती नेतृत्व नसल्याने गटातटात कार्यकर्ते विभागले आहेत. शहरात दोन ते तीन गट सक्रिय आहेत. एकमेकांची तोंडं विरूध्द दिशेला आहेत. अशा अवस्थेत शिवसेना महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीस कशा पध्दतीने सामोरे जाणार असा प्रश्न एकनिष्ठ शिवसैनिकांतून उपस्थित होत आहे. आता पालिकेत माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली चार नगरसेवक पक्षाचे काम करतात.

गेल्या निवडणुकीत त्यांनीच नेतृत्व केले होते. पण यावेळी त्यांच्याकडेच नेतृत्व राहणार की खासदार संजय मंडलिक यांच्याकडे येणार, हे पक्षश्रेष्ठींनी अद्याप जाहीर केलेले नाही. स्वत:हूनच दोन्ही नेते काम करीत आहेत. पण काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांच्या तुलनेत शिवसेनेच्या नेत्यांची तयारी कमी दिसत आहे. नियोजनबध्दता नसल्याने तयारीतही विस्कळीतपणा आला आहे.

जिल्ह्यात कुठलाही शासकीय कार्यक्रम असो, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे दोन्ही मंत्री पुढे असतात. शिवसेनेचे नेते मात्र व्यासपीठावर ‘शोधावे’ लागतात. राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले असले, तरी ते शिवसेनेसाठी फार काही करतात, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. खा. संजय मंडलिक हे शिवसेनेपेक्षा काँग्रेसमध्येच जास्त रमलेले दिसतात. काँग्रेसच्या मदतीने आपण खासदार झालो, ही भावना त्यामागे असावी कदाचित. खा. धैर्यशील माने हेही पक्षवाढीसाठी भरीव कार्य करतात, असे काही दिसलेले नाहीये. तीच अवस्था माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखांमधील गटबाजीची. कोणतेही आंदोलन दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे केलेले दिसून येते. त्यामुळे नेमकी मूळ शिवसेना कोणती, याबाबत सर्वसामान्यांत संभ्रम होतोच, त्याचबरोबर सच्चा शिवसैनिक नाउमेद होतो, हे या नेत्यांना कळत नसेल का ?

प्रत्येक निवडणुकीपूर्वी ‘राणा भीमदेवी’ थाटात महापालिकेवर भगवा फडकवू, अशा गर्जना केल्या जातात. पण त्या फुसका बारच ठरतात. मागील निवडणुकीवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती, त्या वेळीही वरकरणी एकत्र येण्याचा देखावा करण्यात आला, नंतर प्रत्यक्षात मात्र एकमेकांचे पाय ओढण्यातच पक्षातील गटांनी धन्यता मानली. त्यामुळे मनपावर भगवा फडकवणे तर सोडाच, एकूण जागांपैकी १० टक्के जागाही शिवसेनेला जिंकता आल्या नाहीत, हे कटू वास्तव आहे.

वास्तविक, शिवसेना हा लढाऊ कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसैनिक जर जिद्दीने पेटून उठून निवडणुकीत उतरला तर काय होते, हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनेकवेळा दिसून आले आहे. तीच जिद्द कोल्हापूर मनपा निवडणुकीत का दिसून येत नाही, असा सवाल शिवसेनेला मानणाऱ्या वर्गातून होत आहे.