मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाच वेळी समन्स बजावूनही ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेचे कारण देत देशमुख चौकशी टाळत आहे. त्यामुळे देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असताना भाजपने एक महत्त्वाची मागणी केली आहे. देशमुख यांच्या वाटमारीत मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची कितपत भागीदारी होती, याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, खंडणी वसुलीचा आरोप आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी  अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. गृहमंत्री असताना देशमुख यांनी सचिन वाझे याला महिना १०० कोटी रुपये वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा लेटरबॉम्ब परमबीर यांनी टाकल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.