जालना (प्रतिनिधी) : कोरोना विषाणुच्या ओमायक्रॉन  व्हेरियंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तर महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकातही दोन रूग्ण आढळल्याने राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  ओमिक्रॉन व्हेरियंटवर लस किती प्रभावी आहे, याची माहिती दिली आहे.

टोपे म्हणाले की, कर्नाटकातील परिस्थितीवर मी भारत सरकारचे आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांच्याशी बोललो आहे. २ पेशंट बाधित असून त्यापैकी एक चांगल्या स्थितीत आहे. तर एक रुग्णालयात दाखल आहे.  जवळपास ३० पेक्षा अधिक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. या संसर्गाचा वेगही जास्त असला तरी, याची लक्षणं सामान्य आहेत. कुणी गंभीर आजारी नसून ऑक्सिजन किंवा इतर त्रास नाही व मृत्यूचे प्रमाणही कमी आहे.

या विषाणूची संसर्गाची क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे लसीकरण करून घेणे फार आवश्यक आहे. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी या व्हेरियंटवर उपयुक्त असून अँटिबॉडीजना हा व्हेरिअंट भेदू शकत नाही,  असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.  सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री  टोपे यांनी केले आहे.