मुंबई (प्रतिनिधी) : पोलीस अधिकारी सचिन वाझे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सुई फिरत आहे. ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत?  वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे. सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. यात काही तरी काळंबेरं असून या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे द्यावी, अशी मागणी  भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह  मुंब्रातील रेतीबंदर येथे शुक्रवारी (दि.५) संशयास्पद अवस्थेत आढळून आला.  या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नावही घेतले जात आहे. वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल शेलार यांनी  करून शंका उपस्थित केली आहे. हिरेन यांच्या मृत्यूबद्दल हिरेन यांच्या कुटुंबियांनी आणि विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यातच हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेतले जात आहे.