कोते येथे घराला आग : संसार उघड्यावर

0
395

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कोते गावातील न्हाव्याची वसाहत येथे  मंगळवार रात्री साडेअकराच्या सुमारास श्रीमती आनंदी रघुनाथ चव्हाण यांच्या घराला आग लागली. सर्व गाव शांत झोपेत असताना अचानक लागलेल्या या आगीमुळे सर्वत्र हाहाकार माजून एकच गोंधळ उडाला.

परंतु आग आजुबाजूच्या घराकडे पसरण्याआधी  डॉ. संदीप सुतार आणि युवकांनी प्रसंगावधान राखून आग विझवण्यात यश मिळवले. परंतु या आगीत चव्हाण यांचे  सुमारे अडीच लाखांच्या आसपास कौटुंबिक साहित्याचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच  पोलीस पाटील श्रीकांत कांबळे आणि गाव कामगार तलाठी संदीप हजारे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा  करण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी सरपंच दिलीपराव गुरव, सामाजिक कार्यकर्ते जयवंत कोतेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.