मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी आटोक्यात असल्याने १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्स देखील रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. ‘आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता. त्या निर्बंध कमी करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता दिलेली आहे. यानुसार आता १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. यासोबतच महत्त्वाचे म्हणजे लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे १४ दिवस झालेले असणे आवश्यक असणार आहे. असे असेल त्यांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी असणार आहे.’ अशी टोपे यांनी म्हटले आहे.