इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील स्टेशन रोडवर असणाऱ्या हॉटेज जमसम समोर काल (शनिवार) रात्री हॉटेल व्यावसायीकाचा तलवारीसह धारदार हत्याराने निर्घुन खून करण्यात आला. संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव (वय ४२, रा. गणपती कट्टा, जवाहरनगर, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम काणे याच्यासह सातजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने संशयितांच्या घरांवर तसेच दुकानांवर दगडफेक व जाळपोळ केली. तसेच आज (रविवार) सकाळी स्टेशनरोड परिसरात हातगाड्यांची मोठी तोडफोड करण्यात आली. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संतोष जाधव यांचे जवाहरनगर येथे हॉटेल आहे. हॉटेलमधील कामगार व संशयित काणे यांच्यात वाद झाला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला होता. यातील काही संशयितांचा सायंकाळी पोलिस शोध घेत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास पप्पू जाधव मित्रांसमवेत हॉटेल सोनाली परिसरातून जात असताना शुभम कोण, आदित्य सुतार आदीसह संशयितांनी तलवार, कोयता, चाकू यांचा वापर करीत जाधव यांच्यावर हल्ला केला.

वर्मी घाव लागल्याने गंभीर जखमी होवून जागीच कोसळले. त्यानांतर संशयितांनी त्याच्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्नही केला. घटनेनंतर संशयितांनी तलवार घटनास्थळी टाकून पलायन केले. जाधव यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.