बांद्रेवाडीच्या युवतीचा प्रामाणिकपणा

0
139

कळे (प्रतिनिधी) : बांद्रेवाडी (ता. पन्हाळा) येथील युवतीने ऐंशी हजार किमतीची सापडलेली सोन्याची चेन प्रामाणिकपणे संबंधित महिलेस परत केली. ऋतुजा तुकाराम कर्ले असे तिचे नाव आहे.

कळेतील साधना धर्मराज डवरी या परीक्षेसाठी आल्या असता त्यांची सोन्याची चेन विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाच्या आवारात हरवली होती. ऋतुजा कर्ले ही युवती कळे येथील महाविद्यालयातून परीक्षेचा पेपर देऊन ती घरी निघाली असताना तिला ही चेन सापडली. साधना डवरी यांनी महाविद्यालयात आवाहन केले. ओळख पटवून ऋतुजाने ती चेन डवरी यांना प्रामाणिकपणे परत केली. साधना डवरी यांनी रोख पाच हजार रुपये देऊन संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

आपल्या शाळेतील विद्यार्थिनीचा हा प्रामाणिकपणा हीच आमच्या कामाची पोचपावती असल्याचे सांगून अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले व  ऋतुजाचे पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा खर्च महाविद्यालयामार्फत मोफत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी प्रा. नितीन पाटील, प्रा. विक्रम यमगेकर, शिवानी सूर्यवंशी, ग्रा.पं. सदस्य स्वप्नील पोवार, भूषण देशपांडे, वैभव कुरणे, ओंकार पाटील, उमेश पोवार, शुभम पोवार, नीलेश पोवार, रोहित झिरकांडे, युवराज बोरगे आदी उपस्थित होते.