कोल्हापूर (प्रतिनिधी) : विकलांग शेखर कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळेमध्ये बेघर वसाहतीत घर बांधण्यासाठी आ. विनय कोरे, बोरपाडळेचे सरपंच शरद जाधव, माजी सरपंच बंडा पाटील, वारणा दूध संघचे बाळासाहेब खाडे यांनी प्रयत्न करून जागा दिली आहे. मात्र, या जागेवर घर बांधण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नाही.

दरम्यान, समाजमन संस्थाने बोरपाडळेमध्ये जाऊन त्या जागेची पाहणी केली. यावेळी श्रीमती पुष्पा कुलकर्णी यांनी या जागेवर भविष्यात वृद्धदाश्रम बांधणेचा  मानस व्यक्त केला आहे. मात्र, सध्या या जागेवर राहणेसाठी एक खोलीची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक, राजकीय व्यक्ती यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन समाजमन अध्यक्ष महेश गावडे यांनी केले आहे.

काही महिण्यापूर्वी शेखर कुलकर्णी यांचा घरात अपघात झाला आणि शेखर कुलकर्णी यांना गंभीर इजा झाली होती. त्यांचे पहिले ऑपरेशन झाले होते. मात्र, दुसरे ऑपरेशन आर्थिक परिस्थितीमुळे होऊ शकले नव्हते. या प्रश्नाला समाजमन संस्थाने लक्ष वेधले. त्यानंतर अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी शेखर यांच्या पुढील उपचाराची जबाबदारी घेतली. त्या नुसार शेखर यांच्यावर १३ ऑक्टोबरला अॅस्टर आधारमध्ये ऑपरेशन होणार असल्याची माहिती प्रा. एम.टी पाटील यांनी दिली.

दरम्यान, कुलकर्णी कुटूंबाला कोणाचा आधार नाही. ते भाड्याच्या घरात राहतात. सध्या त्यांना या जागेत घर बांधण्यासाठी पैशांची गरज आहे.  त्यासाठी समाजामधील दानशूर व्यक्ती, संस्था, राजकारणी, उद्योजकांनी पुढे येणाची गरज असल्याचे समाजमन संस्थेने सांगितले.