घरफाळा घोटाळ्याचा चौकशी अहवाल लवकरच जाहीर : शिल्पा दरेकर

0
119

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा घोटाळ्याचा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून येत्या ४५ दिवसात जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन आज (गुरुवार) उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी शहर व जिल्हा नागरी कृती समितीला दिले आहे, अशी माहिती कृती समितीचे समन्वयक रमेश मोरे यांनी दिली.

महापालिकेत घरफाळा विभागात गेल्या १० वर्षामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला असून त्या संदर्भात गेल्या वर्षभरात चौकशी समितीचे चार अहवाल प्रशासनाकडे सादर होवून १९ अधिकारी व कर्मच्याऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहेत. व कोट्यावधीचा घोटाळा चौकशी समितीच्या निदर्शनास येऊनही किरकोळ चार कर्मचाऱ्यांना फौजदारी गुन्ह्यात अडकवून निलंबित केले आहे. तर   ज्यांच्यावर घोटाळ्यांचे मोठे दोषपत्र आहे, ते अधिकारी समाजामध्ये उजळमाथ्याने फिरत आहेत.

या संदर्भात आज कृती समितीने महापालिकेसमोर अभिनव आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, घरफाळा विभागाचा कार्यभार असणाऱ्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी आंदोलन करु नका, अहवाल अंतिम टप्प्यात आहे. येत्या ४५ दिवसांत घरफाळा घोटाळ्याची चौकशी पूर्ण करुन घोटाळा झाला आहे किंवा नाही, ते जाहीर करण्याचे आश्वासन कृती समितीला दिले. तर यापूर्वीच्या चौकशी समितीने दोषी ठरविलेल्या १५ अधिकाऱ्यांवर कायदेशीर फौजदारी कारवाई करणे, भोगवट्याप्रमाणे फाळा आकारणीची बिले वाटप करण्याची प्रक्रिया राबविली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी अशोक पोवार, चंद्रकांत सुर्यवंशी, विनोद डुणुंग, राजू मालेकर, लहुजी शिंदे, भाऊ घोडके, सुरेश कदम आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.