टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठया प्रमाणात वाढत आहे. सद्यस्थितीत बेड न उपलब्ध होणे, ऑक्सिजनचा तुटवडा आणि नवीन कोरोनाचा स्ट्रेन पाहता ग्रामस्तरावर दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना होम क्वांरटाईन करता त्यांना गावातील निश्चित शाळेत अलगिकरणात ठेवावे. हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी कार्यकारी दंडाधिकारी प्रदीप उबाळे यांनी सांगितले.

यावेळी कोरोना पॉझिटिव्ह येणार्‍या रुग्णांच्या घरातील इतर व्यक्तीही कोरोना बाधित होत आहेत. लक्षणे नसणारे अथवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असणारे रुग्ण मोठया प्रमाणात होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहेत. परंतु होम आयसोलेशनमधील रुग्ण हे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नसल्याने इतरांचे संपर्कात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे या रुग्णांना होम आयसोलेशन न करता गावातील निश्चित केलेल्या शाळेत अलगिकरणात ठेवण्यात यावे.

तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची रेपिड अँटीजेन टेस्ट चाचणी करण्यात यावी. या व्यक्तींचे स्वॅबचे रिपोर्ट येईपर्यंत संबंधितांना गावातील अन्य शाळेतच कॉरंटाईन करण्यात यावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.