मुंबई (प्रतिनिधी) : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांनी याबाबतची  तक्रार पोलीस महासंचालकांकडे केली आहे. आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  

वळसे- पाटील म्हणाले की, मला वाटत नाही, की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे. तशा कोणत्याही सूचना कुणालाही दिलेल्या नाहीत. तसेच त्यांच्या आरोपांविषयी आपल्याला फार माहिती नाही, त्याची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेन, असेही त्यांनी सांगितले.

एनसीबीने मुंबईत क्रूजवर छापा टाकून आर्यन खानसह एकूण ८ आरोपींना अटक केली आहे. त्यापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांच्या आरोपांमुळे राज्यातील  वातावरण तापले असून मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यावर आता वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे.