मुंबई (प्रतिनिधी) : दिल्ली पोलिसांनी मुंबईत घातपात घ़डवून आणण्याचा डाव उधळून लावत ६ दहशतवाद्यांना अटक केली. त्यापैकी  एकाचे मुंबई कनेक्शन आता समोर आले आहे. तर या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (बुधवार) संध्याकाळी बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर अधिकारी उपस्थित  राहणार आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले  की, या प्रकरणाची माहिती घेण्याच्या संदर्भात मी बैठक बोलावली आहे. हे प्रकरण देशस्तरावरचे आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करुन मी माहिती घेईन आणि त्यानंतर यावर भाष्य करेन.

दरम्यान, मुंबईसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट तपास यंत्रणांनी उधळून लावला आहे. मुंबईतील या जान मोहम्मदचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचेही सांगितले जात आहे.  ६ जणांना अटक केलेल्यापैकी दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (आयएसआय) प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे.