गृहमंत्री अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर ‘मोठा’ आरोप

0
19

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज (मंगळवार) गंभीर आरोप केला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, असा आरोप देशमुख आणि जाधव यांनी विधानसभेत केला.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले की, २०१८ मध्ये अन्वय नाईक व त्यांच्या आईने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकले. या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत होते. ही जर चौकशी झाली, तर माजी मुख्यमंत्री अडचणीत येतील. म्हणून सचिन वाझेला टार्गेट केले जात आहे. त्यामुळे वाझेंना अजिबात काढायचे नाही, अशी मागणी जाधव यांनी केली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दाबले, असे सांगून भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा दिला.

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. हे भास्कर जाधव यांना माहिती नाही. तुम्ही  आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत, आम्ही धमक्यांना घाबरणारी लोकं नाहीत. करा आमची चौकशी, आम्ही धमक्यांना घाबरत नाही. कर नाही तर डर कशाला, असे फडणवीस म्हणाले.