मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस खात्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील ५५ वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा  आदेश गृहमंत्र्यांनी आज (गुरूवार) दिला आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन काळात पोलिसांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पोलिसांनाही धोका पोहोचू शकतो. याआधी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. काही पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. पोलिसांना २४ तास रस्त्यावर उतरून काम करावे लागत आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोनाचा जास्त धोका आहे, तेथील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील लोकलसेवा बंद करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा २५ हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.