कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू होणार आहे. राज्यातील शिक्षक संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी केली जात होती.

सुट्याबाबतच्या सूचना जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना द्याव्यात, असे शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी पत्रकात म्हटले आहे. १ मे २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असणार आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात आणि विदर्भातील उच्च तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार २८ जून  रोजी शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आलं आहे.