कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जाण्याने समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याच्या भावना राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त करून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

समाजाच्या हितासाठी अखेरपर्यंत त्यांनी रस्त्यावर उतरून लढाई केली. कामगार-शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे, आंदोलने करत न्याय भूमिका घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन, सीमाप्रश्न, वीजप्रश्न, वंचितांचे विविध प्रश्नांवर लढा उभारणारे अभ्यासू आणि वैचारिक, कणखर असलेले हे व्यक्तिमत्व आमच्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे हे त्यांनी कृतीतून करून दाखविले. सामान्यांच्या प्रश्नासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले. सर आज आमच्यात नाहीत, ही भावना अत्यंत वेदनादायी आहे.