कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्लॅनेट मराठीच्या ‘सोप्प नसतं काही’ आणि ‘जॉबलेस’ या दोन वेबसिरीज रसिक प्रेकक्षांच्या पसंतीस उतरली होती.  ‘प्लॅनेट मराठी’ आता निपुण धर्माधिकारी, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे, मकरंद शिंदे दिग्दर्शित ‘हिंग पुस्तक तलवार’ ही प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारी वेबसिरीज ३१ ऑगस्टपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तशीच मित्रपरिवारातील सर्वांचेच व्यक्तिमत्वही सारखे नसते. अशाच वेगवेगळ्या पार्श्वभूमीचा मित्रपरिवार एकत्र येऊन प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहे. नुकताच सोशल मीडियावर ‘हिंग पुस्तक तलवार’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या वेबसिरीजमध्येही तशाच काही ना काही खासियत असणाऱ्या भन्नाट व्यक्तिरेखा आहेत.

कॉर्पोरेटच्या कटकटीला कंटाळलेला ‘अक्षय’ तर गर्लफ्रेंड आणि बॉसमध्ये अडकलेला ‘अमित’, साधी भोळी आणि इनोसेंट अशी ‘अमृता’, दुसऱ्यांची लग्न जुळवणारा पण स्वतःच्या गर्लफ्रेंडला प्रत्येक मुलीत शोधणारा ‘समर’ तसेच मित्रांमध्ये बडबड करणारा परंतु  इतरांसमोर शांत असणारा ‘कौस्तुभ’, खूपच प्रॅक्टिकल असणारी ‘सानिका’ आणि प्रत्येकाच्या प्रॉब्लेमचे वन स्टॉप सोल्युशन देणारा ‘पांडे’. आता हे भिन्न स्वभावाचे सर्वजण जेव्हा एकत्र येतील तेव्हा धमाल उडणार आहे.

ही वेबसिरीज ओमकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांनी लिहिली आहे. तर यामध्ये शौनक चांदोरकर, सुशांत घाडगे, केतकी कुलकर्णी, क्षितिश दाते, नील सालेकर, मानसी भवाळकर आणि अलोक राजवाडे यांनी भूमिका साकारली आहे.