कोल्हापूर (प्रतिनिधी)  : अभिनेता अक्षय कुमार याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ९ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होत आहे. त्याचे नाव हेतुतः ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवले आहे. यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात नायकाचे नाव ‘आसिफ’, तर नायिकेचे नाव ‘प्रिया यादव’ असून त्यातून मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांचे संबंध दाखवून हेतुतः ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहनच दिले आहे. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

शिंदे यांनी म्हटले आहे की, एकीकडे ‘मोहम्मद : दि मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटामुळे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात, म्हणून त्यावर स्वतः दखल घेऊन लगेच बंदीची शिफारस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याच धर्तीवर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावरही सरकारने बंदीची शिफारस करावी, अशी मागणीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने ‘लक्ष्मी बॉम्ब’ नावाने चित्रपट काढणारे कधी ईदच्या निमित्ताने ‘आयेशा बॉम्ब’, ‘शबीना बॉम्ब’, ‘फातिमा बॉम्ब’ नावाने चित्रपट काढण्याची हिंमत करतील का ? मुसलमानांच्या धार्मिक भावनांचा विचार चित्रपट निर्माते आणि शासनकर्ते करतात, तसा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार का करत नाहीत ? हिंदूविरोध हेच जणू सध्याचे सेक्युलरीझम झाले आहे. चित्रपट निर्माती शबीना खान आणि लेखक फरहद सामजी असल्याने हेतुतः ते हिंदूद्वेष पसरवत असल्याचे लक्षात येते. या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा  शिंदे यांनी दिला.