कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिल रायडर्स अडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने व जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीची पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम शनिवार, दि. २ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.

‘एकदा वापरून टाकून दिले जाणारे प्लास्टिक नाकारण्याचा निश्चय ‘ या विषयासाठी समर्पित करून सर्वात जास्त लांब पल्ल्यांच्या या पदभ्रमंतीमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या सहभागी तरुणाद्वारे कृती आणि जागृती करावी, असा संदेश दिला जाणार आहे.

दोन जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता पन्हाळा येथे शिवा काशीद व बाजी प्रभू यांच्या पुतळ्याचे पूजन  करून  जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे प्रादेशिक अधिकारी जगगणाथ साळोखे, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, पन्हाळा प्रांताधिकारी माळी, पोलीस उप अधीक्षक रवींद्र साळोखे, तहसीलदार शेडगे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत १९८६ पासून सातत्याने सुरू असलेल्या ५८ व्या मोहिमेस सुरुवात होणार आहे.

मोहीम मार्गावर प्लास्टिक कचरा दिसल्यास त्याचे संकलन केले जाणार आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगामधील गड किल्ले, नद्या, नाले, जंगल आणि जैव विविधता यांचे रक्षण करण्यासाठी आपले गाव, नगर, परिसर प्लास्टिकमुक्त कसा राहील, यासाठी जनजागृती केली जाणार आहे. या वर्षी चार मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातून जवळजवळ ५०० शिवप्रेमी सहभागी होणार आहेत.

या ऐतिहासिक मोहिमेमध्ये संस्थेचे ११० स्वयंसेवक कार्यरत आहेत. मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या शिलेदारांना आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. सहभागी युवक-युवतींनी सोबत कोणत्याही प्रकारे प्लास्टिक आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.