कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली आहे. रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर, ऊस गाळप करताना साखर कारखान्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऊस तोडणी ठप्प झाली आहे. तर सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा, करवीर तालुक्यात झाली आहे.   

आज (शनिवार) दुपारी १२ वाजेपर्यंत राधानगरी तालुक्यात ३.४, आजरा १.५, भुदरगड ०.९, गडहिंग्लज ०.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर डिसेंबरमध्ये हातकणंगले – ७१.८, शिरोळ – ३७.९, पन्हाळा – ६२.२, शाहूवाडी – ६६.१, राधानगरी – ६५.९, गगनबावडा – ७२, करवीर- ७२.५, कागल – ५६.६, गडहिंग्लज – ५०.२, भुदरगड – ४६.८, आजरा – ४६.४  व  चंदगड – ४४.५ मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, मका, शाळू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसाचा पावटा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मका, शाळू पिकांनी मान टाकल्या आहेत. तर डोंगरभागातील गवते कुजू लागल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न बिकट होणार आहे. तर पावसामुळे कारखान्यांचा गळीत हंगामात अडथळे येत असून ऊस तोडणी ठप्प झाली आहे. ऊसतोड मजुरांची पाले पाण्यामध्ये गेल्याने त्यांचा राहण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.