मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे,  अशी भीती व्यक्त करत उच्च न्ययालयाने  इयत्ता अकरावीची सीईटी रद्द करण्याचा आदेश आज (मंगळवार) दिला. इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या,  सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, असेही न्यायालयाने  आपल्या आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का  बसल्याचे मानले जात आहे.   

अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. दरम्यान, आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही,  असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

आता विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार इयत्ता दहावीत जे गुण मिळालेले आहेत,  त्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार होती. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती.  मात्र, न्यायालयाने ही सीईटीच रद्द करण्याचा आदेश दिला आहे.