राजाराम कारखान्याच्या अपात्र सभासदांना हायकोर्टाचा दिलासा

0
1374

टोप (प्रतिनिधी) : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजाराम साखर कारखान्याच्या अपात्र सभासदांबाबतचा अंतिम निर्णय चार आठवड्यामध्ये द्यावा, त्यानंतरच कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या अपीलकर्त्या सभासदांना दिलासा मिळाला आहे.

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर विभाग) कोल्हापूर यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे ८१८ सभासद अपात्र ठरविले होते. याविरोधात राजाराम कारखान्याच्या कुबेर भातमारे, शकुंतला कदम, दीपक पाटील, वनिता गायकवाड या सभासदांनी २६ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कागदपत्रांची पुन्हा तपासणी करून सर्व सभासद पात्र ठरवावेत, अशी मागणी याचिकेत केली होती.

प्रादेशिक साखर सहसंचालक यांचेकडून राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी गटातील ८१८ सभासद वगळून यादी प्रसिद्ध होऊ शकते. म्हणून यापैकी चार अपात्र सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी झाली. अपात्र झालेल्या सभासदांचा अंतिम निर्णय सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब पाटील घेणार होते, पण त्यांनी अद्याप यावर निर्णय दिलेला नाहीये.  पण तो निकाल अध्याप लागलेला नाही. त्यामुळे हे अपात्र सभासद वगळून यादी प्रसिद्ध करू नये. अपात्र  सभासदांचा निकाल चार आठवड्यात द्यावा व पुढील चार आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी. असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. धनुका व व्हि.जी.बिश्त यांनी दिला आहे. या निकालामुळे सभासदांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निकालाबाबत कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले की, आजपर्यंत साखर कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून हे सर्व सभासद पात्र होतील व सभासदांना न्याय मिळेल. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने , व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे,  संचालक दिलीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.