कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची इंग्लंडमध्ये असणारी जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा आशयाचे शिवदूर्ग संवर्धन आंदोलन संघटनेचे हर्षल सुर्वे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडमध्ये असणारे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे ही तलवार भारतात आणण्यासाठी कोल्हापुरातून शिवदूर्ग संवर्धन आंदोलन संघटनेच्या वतीने विविध टप्प्यावर आंदोलन सुरू केले आहे. तर केंद्र व राज्य सरकारलादेखील पत्रे पाठवून पाठपुरावा सुरू केला आहे.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन करून लक्ष वेधले  होते.  त्याचबरोबर पुण्यात होणारे इंग्लंड – भारत सामने होऊ न देण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपतींची जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी, अशा मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांना हर्षल सुर्वे यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिले आहे.