मुरगुड (प्रतिनिधी) : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रिक्षाचालकाच्या छोट्या मुलीचा दहावीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलून मुरगूडचे माजी नगराध्यक्ष आणि सानिका स्पोर्ट्स फौंडेशनने समाजासमोर दातृत्वाचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.

काही दिवसांपूर्वी मुरगूड येथील रिक्षाचालक सुभाष धुमाळ यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना अपत्य नसल्याने  त्यांनी सारंगी नावाच्या एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते. हातावरचे पोट असून देखील त्यांनी आपल्यापरीने सारंगीला जिवापाड जपले होते. पण काही दिवसांपूर्वी धुमाळ यांचा कोरोनाने मृत्यू झाला आणि सारंगी पुन्हा वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली.

धुमाळ कुटुंबांवर अशी बिकट परिस्थिती ओढवाल्याने समाज माध्यमातून या मुलीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. सानिका स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा व माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सारंगीचा दहावीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे.