मुंबई (प्रतिनिधी) :  गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. ती आज खरी ठरली आहे. परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. सिंग यांच्या जागी आता राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. तर परमबीर सिंग यांना गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सन १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच नगराळे हे २०१६ मध्ये नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. २०१८  मध्ये त्यांची नागपूरला बदली झाली. नगराळे यांनी पोलीस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून काम करीत होते.  यांचा १ वर्षे ७ महिन्यांचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना नगराळे यांनी बँक ऑफ बडोदा  बँकेवरील दरोड्याची उकल दोन दिवसात केली होती.

हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यामुळे रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची दबाबदारी देण्यात आली आहे.