चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड – गोवा मार्गावरील तिलारीजवळील दोडामार्ग घाटात अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करून या घाटात अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी प्रवाशांतून आणि वाहनधारकांतून होऊ लागली आहे.   

चंदगडवरून गोव्याला जाणारा अतिशय जवळचा मार्ग म्हणून दोडामार्ग घाट ओळखला जातो. यामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे लहान वाहनांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागतात. त्यातच  रविवारी (दि.२८) पहाटे एका वळणावर कंटेनर रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहने अडकल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.

दोडामार्ग घाट हा अरुंद रस्ता आणि वेडीवाकडी वळणे असलेला अवघड घाट आहे. त्यामुळे कंटेनरमुळे या घाटातील वाहतूक खोळंबल्याचे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. तसेच  बरेच अपघातदेखील झाले आहेत. त्यामुळे अशा अवजड वाहनांना अरुंद घाटातून वाहतूक करण्यास मनाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.