नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  उत्तराखंड आणि केरळमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीचा पाऊस गेला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे उत्तराखंडात ढगफुटीचा फटका नाशिकच्या २०० भाविकांना बसला आहे. चारधाम यात्रेसाठी गेलेले हे भाविक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून पावसामुळे उत्तराखंडमधील परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनच्या घटनाही घडल्या आहेत. पूर आणि पावसामुळे आतापर्यंत ४० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नैनीतालमध्ये जास्तीत जास्त २५ मृत्यू झाले आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून नद्यांचे अनेक पूल तुटले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात येत आहे.

तर उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे चारधाम यात्रेसाठी नाशिकमधून गेलेले जवळपास दोनशे भाविक अडकून पडले आहेत. यापैकी नैनिताल परिसरातील २७ जण आपत्कालीन विभागाच्या जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तर काही पर्यटक खाजगी गाड्या तर काही पर्यटन व्यावसायिकांकडून गेल्याने त्यांचा आकडा मिळला नाही आहे.