कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पाटगाव धरण परिसरात गेले चार दिवस संततधार पाऊस सुरू असून, वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेली पंधरा दिवस पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली होती; परंतु सध्या समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पश्चिम भुदरगडच्या खोऱ्यातील शेतकरी रोप लावण्याचे कामांमध्ये गुंतला आहे.

पूर्वीच्या काळी बैलांच्या औत जोडीने केले जाणारे शेतीचे काम आता मात्र फार दुर्मीळ झाले आहे. बैलांची जागा आधुनिक शेती अवजाराने घेतली आहे. त्यामुळे शेतकरी पॉवर ट्रॅक्टरने रोप लावतानाचे चित्र दिसत आहे. मागच्या वेळेची पूरस्थिती लक्षात घेता सर्वांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झाले आहे. उशिरा सुरु झालेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांतून  समाधान व्यक्त होत आहे.