भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस : वेदगंगा पात्राबाहेर…

0
502

कडगांव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मौनीसागर जलाशयातील पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात पाटगाव परिसरात सुमारे १५० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात आत्तापर्यंत सुमारे ७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडली असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

नदीचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. झाडे पडल्याने वीज आणि दूरध्वनी सेवा  विस्कळीत झाली आहे. भुदरगड तालुक्यातील कोंडोशी लघु प्रकल्प पूर्ण भरला आहे. मेघोली, फये लघु प्रकल्पातील पाणीसाठा वाढत असल्याने यावर्षीही हे दोन्ही प्रकल्प लवकरच भरण्यासाची चिन्हे आहेत. पाटगाव धरणात सध्या पाण्याची पातळी ६२२.९३ मी. असून एकूण पाणीसाठा ७५.४२ द.ल.घ.मी. झाल्याने धरण ७३ टक्के भरले आहे.धरण परिसरात आजअखेर ३१०० मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून महापूराची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.