मुंबई (प्रतिनिधी) : परतीच्या मान्सूनने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असताना आणखी चिंता वाढवणारे वृत्त समोर आले आहे. राज्यात पुन्हा पुढील तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील तीन दिवस मध्यम तसेच तुरळक स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. २१ ऑक्टोबरला दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

तर २२ ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी केएस होसाळीकर म्हणाले की, पुण्यामध्ये ढगफुटीसदृश पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण रडारवर १० किलोमीटरपेक्षा अधिक उंचीचे ढग दिसून येत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी सावधानता बाळगावी, असा अतिदक्षतेचा इशाराही त्यांनी दिला आहे.