पुणे (प्रतिनिधी) : जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडाला होता. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने दडी मारली. आता पुन्हा या आठवड्यात पाऊस पडण्याचा अंदाज   हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात १७ व १८ ऑगस्ट रोजी सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने पावसाला अनुकुल वातावरण तयार होणार आहे.

आज (मंगळवारी)  पुणे,  कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, वाशीम या जिल्ह्यांसाठी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी केला आहे.

बुधवारी ( दि. १८)  पावसाचा जोर अधिक राहील. बुधवारी नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान,  राज्यात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती नसल्याने  १८ ऑगस्टनंतर पाऊस हुलकावणी देण्याची शक्यता आहे.