राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून धरण ७५ टक्के भरले आहे. मुसळधार पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर आला असून सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, पुराचे पाणी शेतात शिरले आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून पडळी, पिरळ दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत.

कारिवडे, राऊतवाडी, कासारवाडी, सावर्धन, कसबा तारळे, दुर्गमानवाड व वाड्या-वस्त्या या गावांचा राधानगरीशी संपर्क तुटला आहे. वास्तविक धरणातील चार स्वयंचलित दरवाजे खुले झालेनंतर या गावांचा संपर्क तुटतो. मात्र, अचानकपणे पाणी वाढल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गुरुवारी सकाळी सहापासून सायंकाळपर्यंत अवघ्या आठ तासात २१२ मिलिमीटर इतका पाऊस झाला. धरणाची सध्याची पाणी पातळी ३३५ फूट इतकी असून धरण ३४७ फूट इतक्या पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ दहा फूट पाणी पातळी कमी आहे.

आज अखेर एकूण १९०६  मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून सध्या खाजगी पॉवर हाऊस मधून १४२५  क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. धरणकाठावरील लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास दोन दिवसांत धारण भरेल असा अंदाज पाटबंधारे विभागाचे अधिकारी विवेक सुतार यांनी वर्तवला आहे.