नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर १६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध मुद्द्यांवरील याचिकांवर सुनावणी सुरू असून, या सर्व याचिकांवर पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीमध्ये सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेसह सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. यापूर्वी २९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार होती; मात्र पाच सदस्यीय घटनापीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने ही सुनावणी टळली होती. २९ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी कधी? अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी राज्यात असंवैधानिक पद्धतीने आलेले सरकार असून, या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी केली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठाला सांगितले की, या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेतली जावी. यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भातील याचिकावरील सुनावणीसाठी १३ जानेवारी ही तारीख निश्चित केली. १३ जानेवारी रोजी सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.