कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाकाळात आपल्या जीवावर उदार होऊन नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांनी अतिशय चांगले काम केले आहे. अशा कोरोना योद्ध्यांचा भविष्यात होणाऱ्या सरकारी नोकर भरतीत समावेश करावा अशी मागणी परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे आणि जिल्हा उपाध्यक्ष नेहा वेदांते यांनी पत्रकार परिषदेत केली.

कोरोनाकाळात अनेक डॉक्टरांनी काम करण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत आरोग्य सेवा देण्यासाठी परिचारिका कर्मचारी यांनी आपले पूर्वीचे जॉब सोडून या काळात केंद्रांमध्ये समाजसेवा करण्याचे काम हाती घेतले. या काळात सरकारी नोकरी करणारे काही डॉक्टरांनी सरकारी कर्मचारी सेवेत रुजू न होण्याचा पवित्रा घेतला होता. अशा परिस्थितीमध्ये परिचारिका कर्मचारी यांनी मृत्यूला न घाबरता देशाचे, राज्याचे, मानवतेचे काम हातात घेतले. त्यानंतर त्यांना शासनाने आरोग्य सेवा देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले. आता काही सेंटर बंद पडून परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यांच्या योगदानाचा शासनाने विचार केलेला नाही.

काही नर्सिंग स्टाफचे दोन महिन्याचा पगार थकीत राहिलेला आहे, तो पगार त्वरित देण्यात यावा. तसेच भविष्यात होणाऱ्या सरकारी नोकर भरतीत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली. पत्रकार परिषदेला जिल्हा उपाध्यक्ष नेहा वेदांते, जिल्हा सचिव सुरज नाईक, सह खजिनदार मंजुळा कांबळे उपस्थित होते.