मुंबई (प्रतिनिधी) : पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही ५११ वरुन ३५० पर्यंत कमी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकारांशी ते बोलत होते.

ते म्हणाले, मला समाधान आहे, आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांना अपलोड केले. त्याच्या तुलनेत लस थोडी कमी आली आहे. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल. १५ जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस १०० टक्के पोहोचणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० जणांना लस देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे.

महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या वतीने ९ लाख ६३ हजार लसींचा डोस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पण महाराष्ट्राला सतरा ते साडेसतरा लाख लसींच्या डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख लसींचे डोस दाखल झाले आहेत. लस अत्यंत सुरक्षित असून सर्वांनी घ्यावी, असे मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन करतो. आरोग्य सेवक खरे लढवय्ये आहेत. मी लसीकरण करणार, मी स्वतः सुरक्षित राहणार, मी इतरांना सुरक्षित ठेवणार’ असा संदेश त्यांनी लस घेऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे.