मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग हातपाय पसरू लागला आहे.  या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून पत्राद्वारे राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोनायोद्धे, विशेषत: डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस आणि स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो, असे टोपे यांनी पत्रात म्हटले आहे.

अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही. पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र, आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे.

समजदार, संवेदनशील आणि सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टाळणे केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिलं की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा.

दरम्यान, शेवटी स्वत:ची म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी आणि प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया कोरोनाला, एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने, असे आवाहन राजेश टोपे यांनी जनतेला केले आहे.