मुंबई (प्रतिनिधी) : आरोग्य विभागाच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ पदासाठी २४ आणि ३१ ऑक्टोबररोजी परीक्षा घेण्याचा निर्णय आज (सोमवार) झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती १ ऑक्टोबरपर्यंत देण्याच्या सूचनाही दिल्याचे टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे यांनी सांगितले की, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ९ दिवस आधी हॉलतिकीट दिले जाणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असल्याने अशा वावड्या उठविल्या जात आहेत. त्यावर कारवाई कऱण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही गैरमार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करू नये. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, चुकीचे काही निदर्शनास आले तर तातडीने संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. परीक्षा पारदर्शक पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
दरम्यान, २६ सप्टेंबरला होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर विरोधकांनीही राज्य सरकारच्या भोंगळ कारभारावर टीका केली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याप्रकारावर माफी मागत लवकरच परीक्षा पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. तर परीक्षा घेणाऱ्या न्यासा या कंपनीवर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.