कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी : पालकमंत्री

0
56

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेतली पाहीजे. ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोना प्रतिबंधासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवार) केले. ते कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत बोलत होते.

यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत काटेकोर उपाययोजना करायला हव्यात. राज्याला कोल्हापूरने दिलेली ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. सर्वांनीच दक्षता घेतली पाहीजे. मागील अनुभव पाहता आपण सर्वांनी काळजी घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी. गांभिर्याने सर्व क्षेत्रातील प्रमुखाने याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी, मागील वर्षी अतिशय शिस्तबध्द यंत्रणा राबविली होती. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक तयारीवर भर द्यावा लागेल. मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रिवर भर द्यावा लागणार असल्याचे सांगितले.

जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी, ४५ वर्षावरील बाधित तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर नेऊन त्यांचे लसीकरण ३१ मार्च पूर्वी पूर्ण करून तरुणांनी आधुनिक श्रावणबाळ व्हावे, असे आवाहन केले.

जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी, लॉकडाऊन, संचारबंदी नको असेल तर प्रत्येकांनी स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेतली पाहीजे. नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. त्याचे प्रबोधनही करुन प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, रिक्षा संघटना, नाभिक संघटना, हॉटेल मालक संघटना, रेशन दुकान संघटना, सिनेमागृह संघटना, क्रिडाई, चेंबर ऑफ कॉमर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.