मुंबई (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, मुंबईत भाजपाने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना उमेदवार देशमुख यांच्याकडून चूक झाली. त्यांनी कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा माजी मुख्यमंत्री असे संबोधले. देशमुख यांच्या या उल्लेखाने अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अनावधानाने त्यांच्याकडून ही चूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले.

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्या १० ते १२ वर्षांपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केल्याचे देशमुख यांनी म्हटले. पण पाटील यांचा नामोल्लेख करताना देशमुख यांच्याकडून चूक झाली. दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा १८ नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत वाढली आहे. नेतेमंडळींनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे.