वसई (प्रतिनिधी) : तरुणाई स्वत:ची शरीरयष्टी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपडताना दिसत आहे. तरुणवर्ग मसल्स बनवण्यासाठी जिमला जातात. यासाठी आहारामध्येही मोठा बदल करतात. इतकेच नाही तर बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉईड या इंजेक्शनचाही वापर करतात. हेच स्टेरॉईड इंजेक्शन शरीराला खिळखिळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार वसईमध्ये समोर आला आहे. स्टेरॉईडमुळे वसईतील एका ३७ वर्षीय तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समोर आले आहे.

समीर साखरेकर असे त्या तरुणाचे नाव आहे. बॉडी बनवण्यासाठी समीर जिममध्ये प्रचंड मेहनत घेत होता. २०१३ पासून तो जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा. पिळदार शरीर आणि शरीरावरील दिसणाऱ्या नसा म्हणझे बॉडी बनवणे असा त्याचा समज होता. बॉडी बिल्डरप्रमाणे आपल्याही शरीराचा आकार व्हावा यासाठी समीर साखरेकर याने जिम ट्रेनर तसेच मित्रांच्या सांगण्यावरून फेब्रुवारी २०१९ पासून स्टेरॉईड असलेली औषधं घेण्यास सुरुवात केली. त्याच्या शरीराला सूज येणे सुरू झाले. सूज इतकी वाढली होती की त्याला चालताही येत नव्हते. अखेर अनेक तपासण्यांनंतर दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याचे समोर आले.