हातकणंगले पं.स.चे सभापती महेश पाटील यांचा राजीनामा

0
570

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश बसगोंडा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे आज (बुधवार) सुपूर्द केला. अध्यक्षांनी हा राजीनामा मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे.

सभापती महेश ऊर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांच्याविरूद्ध पंचायत समितीच्या २२ पैकी १६ सदस्यांनी सोमवारी (दि.२१) अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सभापती पाटील हे ताराराणी आघाडीचे सदस्य असून त्यांच्याविरूद्ध भाजप ५, जनस्वराज्य ५, शेकाप ३, शिवसेना २ आणि काँग्रेस १ अशा १६ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. पण पाटील यांनी स्वत:हून सभापतीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाटील यांनी आज आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. पाटील यांच्याविरोधात १६ सदस्यांनी आरोप करून अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर ताराराणी आघाडीचे पुमुख जि.प.सदस्य राहुल आवाडे यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर पाटील यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.