कागल (प्रतिनिधी) : कागल तहसीलदार कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचा  देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी झटक्यात सोडविला. या सभागृहाचा देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या आमदारकीच्या पगारातून दर महिन्याला दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच, अधिकाऱ्यांनीही आपल्या पगारातून या खर्चासाठी  स्वेच्छेने योगदान देण्याचे जाहीर केले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिंदे यांना या सभाग्रहाभोवती तातडीने संरक्षक भिंत बांधण्याचीही सूचना केली.

मंत्री मुश्रीफ यांच्या निधीतून कागलमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच सुंदर बहुउद्देशीय  सभागृह पाच वर्षांपूर्वीच बांधले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मालमत्ता कागल तहसीलदार कार्यालयाकडे सोपवलेली आहे. परंतु या कार्यालयाच्या देखभाल-दुरुस्तीसह डागडुजीसाठी व इतर खर्चासाठी तहसीलदार कार्यालयाकडे लेखाशिर्ष नसल्यामुळे या सभागृह आणि परिसराची दुरवस्था होत आहे.

मंत्री मुश्रीफ आठवड्यापूर्वी महिला बचत गटांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यक्रमाच्या निमित्ताने या सभागृहात गेले होते. त्या वेळी त्यांनी माहिती घेतली व त्यांच्या निदर्शनास आले की वीजबिल न भरल्यामुळे या सभागृहाचे वीजजोडणी तोडलेली आहे. तसेच या सभागृहावर खर्च टाकण्यासाठी तरतूदच नाही.

आज लसीकरण मोहिमेचा आढावा बैठकीच्या निमित्ताने कागलमध्ये सर्वच अधिकारी एकत्र आले होते. या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी या सभागृहावर खर्च करण्यासाठी लेखाशिर्षची तरतूद नसल्याचे लक्षात आणून देताच मंत्री मुश्रीफ यांनी दर महिन्याला आपल्या पगारातून दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले. यावेळी उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्या पगारातून स्वेच्छेने या सभागृहाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी देण्याचे घोषित केले.

कागलच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागलचे पो. नि. दत्तात्रय नाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कागलचे उप अभियंता व्ही. डी. शिंदे, जि. प. बांधकाम विभागाचे कागलचे उप अभियंता चांदणे या अधिकाऱ्यांनी आपल्या पगारातून स्वेच्छेने निधी देण्याचे या वेळी जाहीर केल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी त्यांचे कौतुक केले.