गडहिंग्लजला देशात एक नंबरचे शहर बनवणार..! : ना. हसन मुश्रीफ

0
174

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज हे व्यावसायिक केंद्र आहे. मागील १५ वर्षांत मी ३ वेळा इथून निवडून आलो. शरद पवारसाहेबांमुळे मंत्रिमंडळात संधी मिळाली. गडहिंग्लजमध्ये भव्य प्रशाकीय भवन बांधण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येतील. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय २०० खाटांचे करण्यात येईल. गडहिंग्लजचा सर्वांगीण विकास करून देशातले एक नंबरचे शहर बनविणार, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गडहिंग्लजच्या सर्वांगीण विकासासाठी ११ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल शहर महाविकास आघाडी व गडहिंग्लजकर नागरिकांच्या वतीने त्यांचा आज (शुक्रवार) नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पावसाच्या व्यत्ययामुळे हा कार्यक्रम नगरपालिकेच्या शाहू सभागृहात घेण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ना. मुश्रीफ म्हणाले की, संजय गांधी निराधार योजनेची सध्याची पेन्शन १०००/- असून ती लवकरच २०००/- करण्यात येणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे सरकार येणार हे चित्र स्पष्ट होत.आणि भाजप ने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही.आणि पवार साहेबांनी चाणक्य नीती वापरून महाविकास आघाडी सत्तेवर आणली, अन्यथा आम्हाला विधानसभेच्या पायऱ्यांवर पाच वर्षे बोंब मारत  बसावं लागलं असत. कोरोना महामारीचे संकट अजून आहे. त्यामुळे काळजी घ्या. देशांत निर्मिण्यात आलेल्या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे ग्रामविकास खाते आहे आणि मी ग्रामीण भागातील पुढील पंचवीस वर्षांतील कोणतंच विकासकाम शिल्लक ठेवणार नाही असं आश्वासन त्यांनी दिले.

प्रा. किसनराव कुराडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी गडहिंग्लजमधील सर्व व्यापारी, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते,  इंजनिअर्स, वकील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.