मुंबई (प्रतिनिधी) : तुम्ही कधी क्रिकेट खेळला होता, तरीही तुम्ही क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होता. मग सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली तर बिघडले कुठे ? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. खोत यांच्या या टीकेचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खास आपल्या स्टाईलने समाचार घेतला. कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर खोतांना कळेल काय ते, असा पलटवार त्यांनी केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुश्रीफ म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यावर सेलिब्रिटी ट्विट करत आहेत. शरद पवारांनी वडिलकीच्या नात्याने सचिन तेंडुलकरला सल्ला दिला. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत भाजपमध्ये गेले आहेत. पवारांवर टीका करताना त्यांना लाज वाटायला हवी होती. पवारसाहेब हे खेळावर प्रेम करणारे आणि खेळाची आवड असलेली व्यक्ती आहे. त्यांनी आयपीएल सुरू करून ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून काढण्याचे काम केले. क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर मानधन मिळवण्यासाठी योजना आणली. पण सदाभाऊ खोतांनी तर कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायातून त्यांनी अनेक बेरोजगारांना फसवले. त्यांच्या मुलावर पोलीस केस आहे. कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की मग त्यांना कळेल.